"जागतिक जैवविविधतेचा मानबिंदू: नांदूर मध्यमेश्वर अभयारण्याच्या समृद्ध जीवसृष्टीचा वेध"

महाराष्ट्राचे भरतपूर म्हणून ओळखले जाणारे नाशिक जिल्ह्यातील नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे जागतिक पातळीवर नावाजलेले रामसर स्थळ (Ramsar Site) आहे. गोदावरी आणि कादवा नद्यांच्या संगमावर निर्माण झालेली ही मानवनिर्मित पाणथळ जागा आज जागतिक जैवविविधतेचा एक अमूल्य आणि निसर्गरम्य खजिना बनली आहे. २२ मे या 'जागतिक जैवविविधता दिना'च्या निमित्ताने, या अद्वितीय परिसंस्थेचा, येथील समृद्ध जीवसृष्टीचा आणि पर्यावरणाच्या दृष्टीने असलेल्या महत्त्वाचा घेतलेला हा अभ्यासपूर्ण आढावा.

नांदूरमध्यमेश्वर अभयारण्याचा भौगोलिक विस्तार हा
साधारण १०,००० हेक्टर परिसरामध्ये पसरलेले हे विस्तीर्ण पाणथळ क्षेत्र (Wetland Landscape) असून, त्यातील १,१९८ हेक्टर क्षेत्र अधिकृतपणे 'संरक्षित अभयारण्य' (Protected Sanctuary) म्हणून घोषित करण्यात आले आहे. या ठिकाणाचे अद्वितीय पर्यावरणीय महत्त्व लक्षात घेऊन आंतरराष्ट्रीय स्तरावर याला 'रामसर स्थळ' (Ramsar Site) चा दर्जा देण्यात आला आहे. उथळ पाणी, गाळाची सुपीक बेटं आणि पाण्याचा संथ प्रवाह यामुळे ही जागा जीवसाखळीसाठी अत्यंत पोषक ठरली आहे. येथील
थक्क करणारी जैवविविधता आकडेवारीच्या दृष्टिकोनातून बघितल्यास नांदूर मध्यमेश्वरची परिसंस्था किती समृद्ध आहे, हे येथील प्रजातींच्या संख्येवरून स्पष्ट होते. हे अभयारण्य वनस्पतींपासून ते कीटकांपर्यंत हजारो जीवांचे हक्काचे घर आहे.
 अभयारण्य परिसरात तब्बल ५३६ पेक्षा जास्त वनस्पती आणि प्रजातींची नोंद झाली आहे, ज्या जलपक्षी आणि इतर जीवांना अन्न व आसरा पुरवतात.
 मत्स्य संपदा (Fish Wealth) नद्यांच्या संगमामुळे निर्माण झालेल्या या गोड्या पाण्यात २४ माशांच्या प्रजाती आढळतात, ज्या येथील संपूर्ण अन्नसाखळीचा मुख्य कणा आहेत.
नांदूर मध्यमेश्वर हे केवळ पक्ष्यांसाठीच नाही, तर पाण्याखालील एका समृद्ध जीवसृष्टीसाठीही ओळखले जाते. 
माशांची विविधता हे नांदूरमध्यमेश्वरचे वैशिष्ट्यच म्हणावं लागेल. नांदूर मध्यमेश्वरच्या जलाशयात माशांच्या सुमारे २४ पेक्षा जास्त प्रजाती आढळतात. यामध्ये स्थानिक प्रजातींसोबतच काही दुर्मिळ मासेही पाहायला मिळतात. गोड्या पाण्यातील माशांच्या ४ प्रजाती हया ‘प्रदेशनिष्ठ (Endemic)’ आहेत. महत्त्वपूर्ण आणि चिंताजनक बाब म्हणजे यातील २ माशांच्या प्रजाती हया जागतिक स्तरावर धोक्यात असलेल्या (Globally Threatened) यादितील आहेत. ज्यात शालिनी बार्ब (Shalyni Barb) त्याचप्रमाणे दुसरा मासा , देवळाली मिनो Deolali Minnow (Parapsilorhynchus prateri) Critically Endangered (अतिसंकटग्रस्त). हे मासे नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत, मोठ्या प्रमाणावर वाहून येणाऱ्या पानवेली/ जलपर्णी (Water Hyacinth)
 आणि टायफा ( Typha angustifolia) यांच्या वाढीमुळे तसेच शहरातील सांडपाणी थेट नदीत मिसळल्यामुळे ऑक्सिजनची पातळी कमी होऊन अशा संवेदनशील माशांचा मृत्यू होतो आहे परिणामी पाणथळ परिसंस्था विस्कळीत होत आहे. हे मासे केवळ जलपरिसंस्थेचा भाग नाहीत, तर येथे येणाऱ्या हजारो स्थलांतरित पक्ष्यांचे मुख्य अन्न देखील आहेत.
त्याचबरोबर असंख्य उभयचर आणि सरपटणारे जलचर पाण्याकाठी आणि पाण्यात वावरणारे अनेक जीव या परिसंस्थेचा कणा आहेत.
येथे प्रामुख्याने 'इंडियन फ्लॅपशेल टर्टल' (Indian Flapshell Turtle) पाहायला मिळतात. पावसाळ्यात विविध प्रकारचे बेडूक येथे सक्रिय असतात, पाण्यातील साप (Checkered Keelback) येथे मोठ्या प्रमाणावर आढळतात, हे सर्व जलचर नैसर्गिक स्वच्छतादूत असून पाण्यातील कीटक आणि अळ्या खाऊन पाण्याचे नैसर्गिक संतुलन राखण्यास मदत करतात.
सूक्ष्म जलचर आणि वनस्पती
जलाशयातील 'फायटोप्लँक्टन' आणि 'झूप्लँक्टन' सारखे सूक्ष्म जीव डोळ्यांना दिसत नसले, तरी ते संपूर्ण अन्नसाखळीचा पाया आहेत. तसेच, पाण्यातील वनस्पती आणि शेवाळ हे जलचरांना लपण्यासाठी सुरक्षित जागा आणि प्रजननासाठी पोषक वातावरण निर्माण करतात.
येथील निरोगी पर्यावरणाचे संकेत देणारी ४१ फुलपाखरांच्या प्रजाती आणि २५ पेक्षा जास्त चतुर व टाचणी (Damselflies) प्रजाती या परिसरात मुक्तपणे विहार करताना दिसतात.
नांदूर मध्यमेश्वरची खरी जागतिक ओळख म्हणजे येथील अथांग पक्षीवैभव. हे अभयारण्य देश-विदेशातील ३०० हून अधिक पक्षी प्रजातींचे आश्रयस्थान आहे.
 दरवर्षी हिवाळ्यात सायबेरिया, मध्य आशिया आणि युरोपमधून हजारो मैलांचा प्रवास करून हजारो विदेशी पाहुणे येथे मुक्कामासाठी येतात. हिवाळ्याच्या हंगामात या पाणथळ जागेवर ५०,००० पेक्षा जास्त जलपक्ष्यांचा (Waterbirds) गजबजाट पाहायला मिळतो.
गेल्या काही वर्षांत येथे तब्बल २२ वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडानंतर 'ग्रेट व्हाईट पेलिकन्स' (महाकाय पांढरे रोहित) यांचे दर्शन झाले, जे या अभयारण्याच्या पुनरुज्जीवित परिसंस्थेचे आणि योग्य अधिवास व्यवस्थापनाचे फलित आहे. येथे येणारे रोहित (flamingo) पक्षी अभयारण्याच्या सौंदर्यात भर घालतात.
पूर्वी केवळ २ घरटे आढळणारे 'पेंटेड स्टॉर्क' (चित्रबलाक) आता येथे मोठ्या संख्येने स्थिरावले असून, त्यांची घरटी आता ८० हून अधिक संख्ये पर्यंत पोहोचली आहेत. याव्यतिरिक्त जांभळी पाणकोंबडी (Purple Swamphen) आणि हळदी-कुंकू बदक (Spot-billed Duck) यांचा येथे वर्षभर वावर असतो.
तसेच १५ सस्तन प्राणी प्रजाती येथील जैवविविधतेचे वैभव वाढवतात ज्यात अतिदुर्मिळ पाणमांजर, तरस, बिबट्या, कोल्हे, लांडगे इत्यादि आढळतात.
“संवर्धन आणि स्थानिक कृती: ३०x३० च्या दिशेने पाऊल”
जागतिक जैवविविधता दिनाचे यंदाचे उद्दिष्ट 'स्थानिक कृतीतून जागतिक परिणाम' साधणे हे आहे. नांदूर मध्यमेश्वरच्या बाबतीत वन्यजीव विभाग, स्थानिक निसर्गमित्र आणि गावकऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नातून अनेक सकारात्मक गोष्टी घडत आहेत, 
 जलपर्णी आणि टायफा हटवण्याच्या मोहिमा वैज्ञानिक व तांत्रिक पद्धतीने राबवल्या जात आहेत. तसेच अधिवास निर्मितीची कामे देखील सुरू आहेत. 
संयुक्त राष्ट्रांचे '३०x३०' उद्दिष्ट (30x30 Target) हे डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या 'कुनमिंग-मॉन्ट्रियल जागतिक जैवविविधता आराखड्याचा' (Kunming-Montreal Global Biodiversity Framework) एक मुख्य भाग आहे. पृथ्वीवरील ढासळत चाललेली परिसंस्था आणि जैवविविधतेचा ऱ्हास रोखण्यासाठी हे एक ऐतिहासिक पाऊल मानले जाते.
या जागतिक उद्दिष्टाचे प्रमुख पैलू आणि निकष म्हणजे
३०% जमीन आणि समुद्रचा भाग हा संरक्षित करणे होय . या जागतिक मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट २०३० पर्यंत पृथ्वीवरील किमान ३०% जमीन, अंतर्गत जलस्रोत, पाणथळ क्षेत्र, किनारपट्टीचे भाग आणि महासागरांचे कायदेशीररित्या संरक्षण व संवर्धन करणे हे आहे.
 सध्या जगातील केवळ १५-१७% जमीन आणि साधारण ८% सागरी क्षेत्र संरक्षित आहे. त्यामुळे पुढील काही वर्षांत हा परीघ मोठ्या प्रमाणावर वाढवणे आवश्यक आहे. 
महत्त्वाच्या परिसंस्थांचे पुनरुज्जीवन (Ecosystem Restoration): केवळ नवीन भाग संरक्षित करणे एवढेच याचे काम नाही, तर आधीच मानवी हस्तक्षेपामुळे नष्ट किंवा खराब झालेल्या किमान ३०% परिसंस्थांचे (उदा. पाणथळ जागा/Wetlands, जंगले, आणि नद्या) पुनरुज्जीवन करणे अनिवार्य आहे.
 गुणवत्तापूर्ण संरक्षण हे देखील महत्त्वाचे असुन केवळ कागदावर क्षेत्र 'संरक्षित' घोषित न करता, तिथे प्रत्यक्ष प्रभावी व्यवस्थापन आणि जैवविविधतेची सुधारणा मोजली जाईल. 
याचे महत्त्व काय? असा आपल्याला प्रश्न पडला असणार तर त्याचं उत्तर आहे, 
 हवामान बदलावर नियंत्रण मिळवणे आणि जंगले आणि पाणथळ जागा (Wetlands) हे कार्बन शोषून घेणारे मोठे स्त्रोत (Carbon Sinks) आहेत. त्यांचे रक्षण केल्यास जागतिक तापमानवाढ मर्यादित ठेवण्यास मदत होईल.
 प्रजातींचे संरक्षण: सद्यस्थितीत अनेक वन्यजीव आणि पक्ष्यांच्या प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. ३०% सुरक्षित क्षेत्र मिळाल्यास त्यांच्या अधिवासाचे रक्षण होईल आणि अन्नसाखळी टिकून राहील.

पाण्याचे स्त्रोत आणि शुद्धीकरण: नद्यांचे उगमस्थान आणि पाणथळ क्षेत्रांचे संवर्धन थेट मानवासाठी लागणाऱ्या शुद्ध पाण्याच्या उपलब्धतेशी जोडलेले आहे.
थोडक्यात सांगायचे तर, '३०x३०' हे केवळ निसर्ग रक्षणाचे ध्येय नसून, मानवाच्या स्वतःच्या अस्तित्वासाठी आणि भविष्यातील अन्न आणि पाण्याच्या सुरक्षेसाठी आखलेला एक जागतिक कृती आराखडा आहे.

नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे,तर जागतिक जैवविविधतेचा एक महत्त्वाचा मानबिंदू आहे. या परिसंस्थेचे रक्षण करणे म्हणजे हवामान बदलाचा सामना करणे आणि आपल्या सुजलाम सुफलाम पर्यावरणाचे रक्षण करणे आहे. जागतिक जैवविविधता दिनाच्या निमित्ताने या अनमोल जागतिक ठेव्याचे संवर्धन करण्याची प्रतिज्ञा आपण सर्वांनी घेतली पाहिजे.आपल्याला हे समजून घेणे आवश्यक आहे की, नांदूर मध्यमेश्वरचे सौंदर्य आणि जैवविवीधता टिकवून ठेवण्यासाठी आपल्याला सर्वस्तरांवर एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे तरच आपण पुढच्या पिढ्यांना हा निसर्गाचा वारसा हस्तांतरित करू शकु अन्यथा हा जैवविधतेचा जिवंत खजिना मृत परिसंस्थेत परावर्तित व्हायला जास्त वेळ लागणार नाही.

हिरालाल रमेश चौधरी
(वनपरिक्षेत्र अधिकारी, नांदूरमध्यमेश्वर अभयारण्य, नाशिक)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या