नाशिक :-त्र्यंबकेश्वर तालुक्यातील जोशीवाडी येथील खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीस जन्मठेपेची शिक्षा दिनांक २३/०४/२०२६ रोजी नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील माननीय जिल्हा न्यायाधीश श्रीमती पांढरे मॅडम (न्यायालय क्र.२) यांच्या न्यायालयात,घोटी पोलीस ठाणे गु.र.नं. ६९/२०२२, भारतीय दंड विधान (IPC) कलम ३०२, ३०७, ३२३,५०४ अन्वये दाखल खटल्याची सुनावणी पूर्ण झाली.या गुन्ह्यातील आरोपी किसन महादू पारधी (वय ४०,रा.कळमुस्ते, जांभूळवाडी,ता.त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक) याच्याविरुद्ध आरोप सिद्ध झाल्याने,माननीय न्यायालयाने आरोपीस भा.दं.वि. कलम ३०२ अंतर्गत दोषी ठरवून जन्मठेप आणि १०,०००/- रुपये दंड, तसेच भा.दं.वि. कलम ३०७ अंतर्गत जन्मठेप आणि १०,०००/- रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.
घटनेचा तपशील:
सदर घटना दिनांक २२/०५/२०२२ रोजी सकाळी ०९:४५ वाजता घोटी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जोशीवाडी (ता. त्र्यंबकेश्वर) येथे घडली होती.या गुन्ह्यातील आरोपीची पत्नी इंदूबाई किसन पारधी ही सासरी नांदायला येत नाही, या कारणावरून आरोपीने कुरापत काढली. तो पत्नीला विळ्याने गळ्यावर मारहाण करू लागला असता,भांडण सोडवण्यासाठी आलेल्या माधुरी पारधी हिच्या हातावर विळ्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला.तसेच कमलाबाई भुतांबरे या देखील भांडण सोडवण्यासाठी आल्या असता, त्यांच्या पोटात व पाठीवर कात्रीने भोसकून त्यांना जीवे ठार मारले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास घोटी पोलीस ठाण्याचे तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती श्रद्धा गंधास यांनी केला होता.त्यांनी आरोपीविरुद्ध भक्कम पुरावे गोळा करून माननीय सत्र न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) दाखल केले होते. या खटल्यात सरकारी अभियोक्ता श्रीमती पेटकर यांनी काम पाहिले, तर पैरवी अंमलदार महिला पोलीस हवालीदार भोर यांनी सहकार्य केले. यामुळे आरोपीविरुद्ध गुन्हा शाबीत झाला आहे.तसेच,गुन्हे दोषसिद्धी विभाग नाशिक येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. श्रीकांत पाटील आणि महिला पोलीस अंमलदार अश्विनी परदेशी यांनी गुन्हा शाबीत होण्याच्या दृष्टीने वेळोवेळी कायदेशीर मार्गदर्शन करून पाठपुरावा केला.या गुन्ह्यात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपास अधिकारी,पैरवी अंमलदार आणि दोषसिद्धी विभागातील अधिकारी व अंमलदारांचे विशेष अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा