महामार्गावरील वाहनांवर पाळत ठेवून लूटमार करणाऱ्या टोळीतील मुख्य गुन्हेगार केरळ राज्यातून अटक
नाशिक :- ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दिनांक ११/१२/२०२५ रोजी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर राजूर फाटा परिसरात गुजरात येथील फिर्यादी धर्मेंद्र पटेल व त्यांचे साथीदार हे त्यांच्या स्कॉर्पिओ कारमधून मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून मुंबईच्या दिशेने जात असताना, अज्ञात आरोपींनी संगनमत करून वेगवेगळ्या गाड्यांमधून येत फिर्यादीची गाडी अडवली. फिर्यादीला मारहाण करून आणि साक्षीदाराच्या डोळ्यात काहीतरी टाकून त्यांना बेशुद्ध केले. त्यानंतर त्यांच्या ताब्यातील स्कॉर्पिओ कारमधील रोख रक्कम ४,५०,०००/- रुपये जबरदस्तीने चोरून नेली. याप्रकरणी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात गु.र.नं. २८८/२०२५ भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०९(६), ३२४(४), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्ह्याच्या तपासात यापूर्वी केरळ राज्यातून दोन आरोपींना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली होती. तपासादरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, यातील अटक आरोपींचे इतर साथीदार महामार्गावरील वाहनांची लूट करण्यासाठी पुन्हा नाशिक जिल्ह्यात आल्याची बातमी मिळाली. त्यावरून फेब्रुवारी २०२६ मध्ये पोलीस पथकाने नाशिक-पुणे महामार्गावर दरोड्याच्या तयारीत असलेल्या एकूण १० आरोपींवर कारवाई केली होती. या प्रकरणी सिन्नर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ११०/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४), ३१०(५) सह आर्म्स ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वरील दोन्ही गुन्ह्यांमधील आंतरराज्यीय दरोडा टाकणाऱ्या टोळीतील मुख्य सूत्रधार गुन्हा घडल्यापासून फरार होते. त्यांचा शोध घेण्यासाठी परराज्यातील तपास परवानगीने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक केरळ राज्यात रवाना झाले होते. पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोपनीय माहितीच्या आधारे तपास करून केरळ पोलिसांच्या मदतीने खालील दोन सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे:
१) टायटस जॉर्ज (वय ३७, रा. मझहुवनचेरी हाऊस, पलक्कड, राज्य- केरळ)
२) जॉबी जोसेफ (वय ४८, रा. ताराकुना कोट्टायम, कोलंगुट, राज्य- केरळ)
ताब्यात घेतलेले दोन्ही गुन्हेगार महामार्गावरील वाहनांवर पाळत ठेवून लूटमार करणारे सराईत गुन्हेगार असून, त्यांच्यावर यापूर्वी केरळ, कर्नाटक, तमिळनाडू आणि तेलंगणा राज्यांमध्ये दरोडा, जबरदस्तीने चोरी आणि एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्यान्वये गुन्हे दाखल आहेत. या आरोपींनी वाडीवऱ्हे व सिन्नर पोलीस ठाण्यातील वरील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. त्यांना सिन्नर पोलीस ठाण्यातील गु.र.नं. ११०/२०२६ च्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक श्री. आदित्य मिरखेलकर यांनी दिलेल्या मार्गदर्शन व सूचनांनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्रीदत्तत्रय शिंदे, पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके, पोलीस अंमलदार श्रीकांत गारुंगे, बालाजी कुंतेवाड, केतन कापसे, प्रवीण काकड, नवनाथ शिरोळे, संदीप नागपुरे, कैलास मानकर, तांत्रिक विभागाचे पोलीस हवालीदार हेमंत गिलबिले, प्रदीप बहिरम आणि नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा