१७ ऑक्टोबरला अंबड-दत्तनगर परिसरात शनिवारी मोफत आरोग्य तपासणी शिबिर

नाशिक :- अंबड-दत्तनगर परिसरातील भूजलातील बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तुळजाभवानी मंदिर,अंबड येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने बुधवार, दिनांक १४ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले होते.अंबड परिसरात कामगार वर्गाची संख्या अधिक असल्याने अनेक नागरिकांना या शिबिराचा लाभ घेता आला नाही. त्यामुळे कामगारांना शनिवारी सुट्टी असल्याचे लक्षात घेऊन शनिवार, दिनांक १७ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी २ या वेळेत तुळजाभवानी मंदिर,अंबड येथे पुन्हा शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.भूजलातील बदलांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय सल्ला व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.या शिबिरामध्ये नागरिकांची सामान्य आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, दूषित पाण्यामुळे होऊ शकणाऱ्या आजारांबाबत तपासणी व मार्गदर्शन केले जाईल.तसेच त्वचेचे विकार,खाज,अ‍ॅलर्जी व पुरळ यांसारख्या समस्यांवर वैद्यकीय सल्ला आणि आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले जाणार आहेत. शिबिरात नाशिक शहरातील नामवंत त्वचारोगतज्ञ, वैद्यकशास्त्रतज्ञ, बालरोगतज्ञ, दंत शल्यचिकित्सक, कान नाक घसा तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ व नेत्रविकारतज्ञ नागरिकांची तपासणी करणार आहेत.

नागरिकांनी आरोग्यविषयक तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळेत तपासणी करून घ्यावी. विशेषतः अंबड परिसरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिरात सहभागी होऊन उपलब्ध वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, आयुक्त मनीषा खत्री,आरोग्य समिती सभापती डॉ. पूनम महाले, उपसभापती सतीश निकम, नगरसेवक नितीन दातीर, किरण गामणे दराडे, प्रियंका दोंदे, किरण राजवाडे तसेच नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

शिबिराचा तपशील

दिनांक: शनिवार, १७ ऑक्टोबर २०२६
वेळ: सकाळी १० ते दुपारी २
स्थळ: तुळजाभवानी मंदिर, अंबड, नाशिक
उपलब्ध सेवा: सामान्य आरोग्य तपासणी, दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांबाबत तपासणी व मार्गदर्शन, त्वचारोगविषयक सल्ला, तसेच त्वचारोग, वैद्यकशास्त्र, बालरोग, दंतशल्यचिकित्सक, नाक कान घसा, स्त्रीरोग व नेत्रविकार तज्ज्ञांमार्फत मोफत तपासणी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या