नाशिकमध्ये ३० ऑक्टोबरला भव्य ग्रामपरिक्रमा, तर ३१ ला राष्ट्रपतींच्या उपस्थितीत महाध्वजारोहण सोहळा!

३० ऑक्टोबरला नाशिकमध्ये भव्य ग्रामपरिक्रमा; ३१ ऑक्टोबरला महाध्वजारोहण सोहळा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या नियोजित उपस्थितीत रामतीर्थ येथे धर्मध्वजारोहण; तपोवनातील पत्रकार परिषदेत आयोजकांची माहिती

(प्रतिनिधी समाधान शिरसाठ)
नाशिक :-  आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ३० ऑक्टोबर रोजी भव्य ग्रामपरिक्रमा, तर ३१ ऑक्टोबर रोजी ऐतिहासिक सिंहस्थ महाध्वजारोहण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ आणि सिंहस्थ समितीच्या वतीने रामतीर्थ (रामकुंड), पंचवटी येथे हा सोहळा पार पडणार आहे. याबाबत मंगळवारी (दि. २७ ऑक्टोबर) तपोवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.शुक्रवारी (दि. ३० ऑक्टोबर) दुपारी २ वाजता तपोवन येथील मोदी ग्राउंडवरून ग्रामपरिक्रमेचा प्रारंभ होणार आहे. या परिक्रमेत जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांच्यासह विविध आखाड्यांचे श्रीमहंत, महामंडलेश्वर, साधू-संत, धार्मिक व सांस्कृतिक संस्थांचे प्रतिनिधी महापौर नगरसेवक लोक प्रतिनिधी आमदार खासदार मंत्री सहभागी होणार आहेत.

मोदी ग्राउंड येथून सुरू होणारी परिक्रमा तपोवन, पंचमुखी हनुमान मंदिर, गणेशवाडी, नेहरू चौक, मेनरोड, रविवार कारंजा आणि मालेगाव स्टँडमार्गे रामकुंड येथे पोहोचणार आहे. धर्मध्वज, कुंभरथ, साधू-संतांचे रथ, विविध संस्थांचे चित्ररथ, ढोल पथके आणि आदिवासी बांधवांची पारंपरिक नृत्ये ही परिक्रमाची प्रमुख आकर्षणे असतील. रामकुंड येथे गंगा-गोदावरी महाआरतीने परिक्रमेची सांगता होणार आहे.
शनिवारी (दि. ३१ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजून २ मिनिटांच्या शुभमुहूर्तावर रामतीर्थ येथे सिंहस्थ महाध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती नियोजित असल्याची माहिती आयोजकांनी दिली. देशभरातील संत-महंत, धर्माचार्य आणि हजारो भाविक या सोहळ्यात सहभागी होण्याची अपेक्षा आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित या दोन दिवसीय कार्यक्रमांतून भारतीय सनातन संस्कृती, संतपरंपरा, धार्मिक वारसा आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला जाणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी तपोवन येथील मोदी ग्राउंडवर भव्य मंडप उभारण्याचे काम सुरू आहे.

पत्रकार परिषदेला सतीश शुक्ल (प्रमुख विश्वस्त व सिंहस्थ समितीचे अध्यक्ष), प्रवीण ठाकूर (महामंत्री, जगद्गुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नानीजधाम), चंद्रशेखर पंचाक्षरी (अध्यक्ष तथा विश्वस्त), शेखर शुक्ल (कार्याध्यक्ष तथा विश्वस्त), प्रतीक शुक्ल (सरचिटणीस तथा विश्वस्त), वैभव दीक्षित आणि दिलीप शुक्ल (उपाध्यक्ष तथा विश्वस्त) उपस्थित होते.या धार्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्यात नाशिककरांसह भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन श्री गंगा गोदावरी पंचकोटी पुरोहित संघ आणि सिंहस्थ समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या