(प्रतिनीधी समाधान शिरसाठ)
नाशिक :- नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ तस्करांविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. पिंपळगाव टोलनाका परिसरात सापळा रचून पोलिसांनी तब्बल ५३५ किलो गांजा जप्त केला असून,या कारवाईत एका संशयित आरोपीला अटक करण्यात आली आहे. या कारवाईत गुन्ह्यात वापरलेली पिकअप गाडी,मोबाईल आणि रोकड असा एकूण १ कोटी १२ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार,राहुल शांताराम पाटील,(वय ३३, रा. मुटकी, ता. जि. धुळे) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.अशी झाली कारवाई:
नाशिक बाजूकडून मालेगावच्या दिशेने एका पिकअप गाडीतून गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांना मिळाली होती.या माहितीच्या आधारे पोलिसांनी त्वरित चक्रे फिरवून पिंपळगाव टोलनाक्यावर सापळा रचला. संशयास्पद वाटणारी पिकअप गाडी (क्र. MH-06-BG-1776) येताच पोलिसांनी त्यावर छापा टाकला.पंचांसमक्ष गाडीची कसून झडती घेतली असता, त्यात ५३५ किलो वजनाचा बेकायदेशीर गांजा मिळून आला.पोलिसांनी अंमली पदार्थासह वाहतुकीसाठी वापरलेली पिकअप गाडी, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे.गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू:संशयित आरोपी राहुल पाटील,याच्याविरोधात पिंपळगाव पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. (NDPS) कायद्याच्या विविध कलमांतर्गत गुन्हा (गुरनं २०१/२०२६) दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पिंपळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी करत आहेत.ही धडक कारवाई नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ डि एस स्वामी,अपर पोलीस अधीक्षक (मालेगाव),अपर पोलीस अधीक्षक (नाशिक ग्रामीण)आणि उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पिंपळगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व अंमलदारांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.जिल्ह्यात अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी यापुढेही अशाच कडक कारवाया सुरू राहतील,असा इशारा नाशिक ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.
0 टिप्पण्या