सटाणा जवळील ब्राह्मणगाव येथील साईबाबा मंदिरात धाडसी चोरी; दानपेट्या फोडून ५० हजार लंपास!
सटाणा :- येथील ब्राह्मणगाव शिवारातील अजमेर सौंदाणे रस्त्यावर असलेल्या प्रसिद्ध साईबाबा मंदिरात अज्ञात चोरांनी धाडसी चोरी केली आहे.चोरट्यांनी मंदिराच्या सभागृहातील दोन दानपेट्या फोडून अंदाजे ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.ही घटना २५ मे च्या रात्री ते २६ मे २०२६ च्या पहाटे दरम्यान घडली.मिळालेल्या माहितीनुसार, मंदिराच्या गाभाऱ्यात साईबाबांच्या मूर्तीच्या डाव्या आणि उजव्या बाजूला दोन दानपेट्या ठेवल्या होत्या.चोरट्यांनी या दानपेट्यांचे कुलूप आणि कड्या उचकावून त्या फोडल्या.या पेट्यांमध्ये १०, २०, ५०, १०० आणि ५०० रुपयांच्या नोटा तसेच १० व २० रुपयांची नाणी अशी एकूण ५० हजार रुपयांची रोख रक्कम होती,जी चोरांनी लंपास केली.याप्रकरणी मंदिराच्या शेजारी राहणारे फिर्यादी अनिल त्र्यंबक पवार (वय ५१, रा. ब्राह्मणगाव) यांनी सटाणा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२) आणि ३३४ अन्वये गुन्हा नोंदवला आहे.मालेगाव ग्रामीणचे उपविभागीय पोलीस अधिकारी यशवंत बावीसकर आणि पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राऊत या गुन्ह्याचा पुढील तपास करत आहेत.
0 टिप्पण्या